राहुल गांधींप्रमाणे आता संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा

0
187

मुंबई, दि. १ (पीसीबी) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरचा मानहानीचा दावा आणि त्यामुळे रद्द झालेली खासदारकी हे प्रकरण ताजं असतानाच आता संजय राऊतही अडचणीत आले आहेत. त्यांच्यावरही मानहानीचा दावा दाखल कऱण्यात आला आहे. सतत टीकेचा भडिमार करून भाजपला हैराण करणाऱ्या संजय राऊत यांची खासदारकी घालविण्याचा भाजप नेत्यांचा विचार असल्याची चर्चा आहे.

संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यांना १०० कोटींची नोटीसही देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हा दावा दाखल कऱण्यात आला आहे. लोकनेते एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडे यांनी हा दावा दाखल केला आहे. संजय राऊत सोशल मीडियावरुन तसंच माध्यमांशी बोलताना सातत्याने एकनाथ शिंदे यांचा अपमान करत आहेत. त्यांच्याविषयी वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळे हा दावा दाखल केल्याचं लोखंडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.