मुंबई, दि. ८ (पीसीबी) – विनायक सावरकर यांच्यावर स्वातंत्र्य लढ्यातील योगदनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र लढ्यातील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावरकर इंग्रजांचे हस्तक होते. ते इंग्रजांकडून पैसे घेत होते, अशा अनेक गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात. मी राहुल गांधींचा निषेध करतो. सावरकरांच्या पाठिशी मोठ्या प्रमाणात भारतातील जनता होती. त्यामुळे काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा अपमान केला. स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक सावरकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलं.
सावरकरांनी अनेक क्रांतीकाऱ्यांना प्रेरणा दिली. इंग्रजांचे अत्याचार सहन करूनही अंदमानातील कारागृहात ते भारतीय स्वातंत्र्यांचा विचार करत होते. त्यांनी अनेक कैद्यांना तिथं धीर दिला आहे. त्यामुळे आम्ही राहुल यांचा निषेध करतो. शिवाय राहुल यांनी कितीही सावरकरांवर आरोप केले तरी ते भारतीयांच्या मनातून सावरकरांची चांगली प्रतिमा कधीही पुसू शकणार नाही, असंही फडणवीसांनी नमूद केलं.