राहुल कलाटे लढणार, अखेरपर्यंत माघार नाहीच, ठाकरे, पवार, राऊतांचे प्रयत्न निष्फळ

0
366

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – चिंचवड पोटनिवडणुकित शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून थेट उध्दव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत यांच्यासारख्या सर्व बड्या नेत्यांनी फोन केले. अर्ज माघार घेण्याची मुदत दुपारी तीन पर्यंत होती, मात्र तोपर्यंत कलाटे यांनी ठोस निर्णय केला नाही आणि वेळ संपल्याने आता ते लढणार आहेत हे स्पष्ट झाले.

पोटनिवडणुकित कलाटे यांच्या माघारीचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा झाला होता. चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई, राष्ट्रवादीकडून नाना काटे तर अपक्ष कलाटे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. ही लढत बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत होते. प्रत्यक्षात अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. फक्त तिरंगी लढत झाली तर मतविभागणीचा फायदा भाजपला होण्याची धास्ती महाआघाडीला आहे, त्यासाठीच कलाटे यांची माघार व्हावी म्हणून शेवटच्याक्षणापर्यंत हालचाली सुरू होत्या.. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत आणि स्वतः कलाटे यांना विनवणी केली. खुद्द शरद पवार यांच्या मार्फत काही नेते निरोप घेऊन आले होते.
शिवसेनेचे संपर्कनेते सचिन आहिर आज सकाळी कलाटे यांच्या ऑफिसमध्ये आले आणि चर्चा केली. त्यावेळी ठाकरे यांच्या बरोबर कलाटे यांचे बोलणे झाले. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतो, असे कलाटे यांनी तासाभरापूर्वी सांगितले. प्रत्यक्षात अर्धातास बाकी असतानाही कलाटे यांचा कुठलाच निर्णय नसल्याने आता त्यांच्या माघारीची शक्यता संपली आहे.
अद्याप स्वतः राहुल कलाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत ते दुसऱ्या चर्चेत व्यस्त होते.