राहुल कलाटे यांच्यासह ११ उमेदवारांनी फेरमोजणीसाठी एव्हीएम पडताळणीचे पैसे भरले

0
70

पुणे, दि. 30 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीत महायुती अभूतपूर्व यश मिळालं, महायुतीचे सर्व मिळून २३० उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले आहेत. निवडणुकीत आलेले निकाल हे अपचणीय आहेत. अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिली जात आहे. तसेच पराभवच सगळं खापर हे ईव्हीएम मशीनवर फोडलं जात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन मॅनेज केल्याचा आरोप वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. याची पूर्ण तपासणी व्हावी अशी अपेक्षा काही पराभूत नेत्यांची आहे. त्यामुळे मत फेरमोजणीसाठी जिल्ह्यातील ११ उमेदवारांनी एव्हीएम पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केला आहे.

चिचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे पराभूत उमेदवार राहुल कलाटे, हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिरूर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक बापू पवार, काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडवासलाचे उमेदवार सचिन दोडके या वरिष्ठ नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ निश्चित करून दिली जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदान यंत्राची पडताळणी करायची आहे. त्या यंत्राची निवड करण्याचा अधिकार संबंधित अर्जदार उमेदवाराला आहे. ज्या मतदान केंद्रावर आणि मतदान यंत्राची निवड उमेदवाराने केली आहे त्या यंत्रामधील संपूर्ण मतांचा डेटा मिटवला जाईल. त्यानंतर त्याच मतदान यंत्रावर चिन्हाचे बटण एकूण बाराशे वेळा दाबून त्या बटणांचे एकूण मतदान मोजले जाईल. प्रत्येक यंत्रासाठी फेर पडताळणी करताना ही प्रक्रिया अवलंबली जाणार आहे.

प्रामुख्याने मतदान केंद्रवर पडलेली मत आणि प्रत्यक्षात पडलेला मतांमध्ये मोठी तफावत असल्याचा संशय या उमेदवारांना आहे. या शंकेचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी एकूण मतदान केंद्राच्या किंवा मतदान यंत्र संख्येच्या पाच टक्के या प्रमाणामध्ये मतदान यंत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. मतदान यंत्र पडताळणीसाठी प्रत्येकी शुल्क आणि त्यावर जीएसटी असे एकूण ४७ हजार रुपये प्रति यंत्र याप्रमाणे त्यांनी शुल्क जमा केले आहेत.