राज्यभरातील ५२ हजार दुकानदारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण…
दि. १३(पीसीबी) – राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शिधावस्तूंचे वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयांतर्गत दुकानदारांना अपेक्षित कमीशन वाढ झाली नसली तरीही, राज्यभरातील दुकानदारांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. दुकानदारांच्या कमीशन वाढीसाठी आम्ही पुन्हा सरकारला साकडे घालणारच आहोत. सध्यातरी आम्ही सर्व दुकानदार महायुती सरकारचे आभार मानतो. आता भरीव कमीशन वाढीसह आमच्या उर्वरित मागण्यादेखील लवकरच मंजुर होतील, असा आशावाद ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील ५२ हजार रेशन दुकानांदारांना अंशतः दिलेले आश्वासन पूर्ण केले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून सध्या रास्त भाव दुकानदारांना ई-पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वितरणाकरिता मिळणाऱ्या ₹१५० प्रति क्विंटल (₹१५०० प्रति मेट्रिक टन) या मार्जिन दरात ₹२० प्रति क्विंटल (₹२०० प्रति मेट्रिक टन) एवढी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांना आता ₹१७० प्रति क्विंटल (₹१७०० प्रति मेट्रिक टन) इतके मार्जिन मिळणार आहे. या वाढीमुळे दुकानदारांच्या मूलभूत गरजा पुर्ण होण्यास काहिसा हातभार लागणार आहे. २०१७ पासून अत्यल्प ₹१५० प्रति क्विंटल इतकेच कमिशन मिळत होते, जे आजच्या महागाईच्या तुलनेत अपुरे होते. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर ही अल्पशी का होईना वाढ मिळाली असून, दुकानदारांना काहिसा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. दुकानदार संघटनांच्या पुढील अडचणींवरही तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा सरकारकडे आम्ही व्यक्त करीत आहोत, असे या पत्रकात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे.
”सरकारकडून मागणीनुसार समाधानकारक कमिशन वाढ मिळाली नाही. तरीही रेशन दुकानदार तात्पुरते समाधान मानत आहेत. कमिशनमध्ये तब्बल साडेतीनशे रुपये कमिशन वाढीची दुकानदारांची जुनी मागणी आहे. परंतु, सरकारने केवळ 20 रुपये कमिशन वाढ केली आहे. सद्यस्थितीत सरकारवर मोठा बोजा पडत आहे. ही बाब लक्षात घेत रेशन दुकानदार ही वाढ स्वीकारणार आहेत. परंतु कमीशन वाढीसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. ”
– मा. विजय गुप्ता, खजिनदार-ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन…