दि.२९(पीसीबी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रभक्ती, हिंदूंचे संघटन, देशावर राज्य कोणी करावे याबाबत निर्णायक भूमिका यासंदर्भात तसेच आपत्तींच्या प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. मात्र भविष्यात संघाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी तसेच हिंदूंचे धर्मांतर रोखणे, शिक्षण,आरोग्य यावर काम करावे. आपत्ती प्रसंगी धावून जाण्याची परंपरा कायम राखत मराठवाडा व सोलापूर मधील पूरग्रस्तांसाठी काम करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंचवड गट पिंपळे सौदागर नगरच्या वतीने आयोजित विजयादशमी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सहकार्यवाह महेश करपे , गटकार्यवाह हेमंत फुलफगर, पिंपळे सौदागर नगर कार्यवाह विकास सक्सेना आदी उपस्थित होते.मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, डॉ. केशव हेडगेवार यांनी हिंदूंचे संघटन व राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली. संघाचा एवढा मोठा विस्तार होईल असे कदाचित त्यावेळी त्यांनाही वाटले नसावे.
संघाने राष्ट्रभक्ती, हिंदूंचे संघटन, देशावर राज्य कोणी करावे याबाबत निर्णायक भूमिका यासंदर्भात तसेच आपत्तींच्या प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. मात्र भविष्यात संघाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी तसेच हिंदूंचे धर्मांतर रोखणे, शिक्षण,आरोग्य यावर काम करावे. आपत्ती प्रसंगी धावून जाण्याची परंपरा कायम राखत मराठवाडा व सोलापूर मधील पूरग्रस्तांसाठी काम करावे असे आवाहन सातुर्डेकर यांनी केले.
विजयादशमी हा दिवस सत्याचा असत्यावर,धर्माचा अधर्मावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय दर्शवतो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव केला. म्हणून हा दिवस शौर्य धैर्य आणि विजयाचा प्रतीक आहे. संघातर्फे देशभर शस्त्र पूजन केले जात आहे. भारतीय संस्कृतीत शस्त्र हे फक्त युद्धासाठी नसून संरक्षण, न्याय, धर्मपालनाचे साधन मानले गेले आहे.आपण शस्त्र पूजन करून त्या परंपरेला वंदन करत आहोत. आज समाजात अनेक आव्हाने आहेत त्यावर मात करण्यासाठी एकता शौर्य आणि संघटित शक्तीची गरज आहे असेही सातुर्डेकर म्हणाले.यावेळी संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह महेश करपे म्हणाले की
आणीबाणी, राम जन्मभूमी आंदोलन काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली गेली. पण संघाचे काम चालू राहिले. संघाची कार्यकर्ता निर्मितीची कार्यपद्धतीच वेगळी आहे. श्री राम मंदिर राष्ट्र मंदिर व्हावे यासाठी संघाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.करपे म्हणाले की, संघ स्थापनेला 100 वर्षे होत असताना शंभर वर्षात काय काय झाले त्या टप्प्यांचे स्मरण गरजेचे आहे. भारतीय समाजात सकारात्मक बदलांना गती मिळावी आणि समाजात शिस्त व देशभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने संघाने पंचपरिवर्तन कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यात कुटुंब प्रबोधन पर्यावरण, समरसता,स्वबोध, नागरिकांची कर्तव्य या कार्यक्रमांचा समावेश असल्याचे करपे यांनी सांगितले.