राष्ट्रीय महामार्ग 48 च्या सेवा रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करा – खासदार बारणे

0
120

खासदार बारणे यांच्या बैठकीनंतर NHA चे अधिकारी ‘ॲक्शन मोड’वर

देहूरोड ते वाकड एलिव्हेटेड रोडच्या कामाचाही घेतला आढावा

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या देहूरोड ते वाकड या पट्ट्यातील सेवा रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) युद्ध पातळीवर दुरुस्ती करावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. त्यानंतर एनएचआयचे अधिकारी ‘ॲक्शन मोड’वर गेल्याचे पाहायला मिळत आहे.

देहूरोड ते वाकड दरम्यानच्या प्रस्तावित एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी आढावा घेण्यासाठी खासदार बारणे यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी सी. एस. कदम, पिंपरी महापालिकेचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, प्रेरणा सिनकर, सल्लागार राज अतुलकर, रणजीत माने आदी उपस्थित होते.

एलिव्हेटेड रोडच्या दोन्ही बाजूंनी २४ मीटरचे सेवा रस्ते असणार आहेत. किवळे, पुनावळे, ताथवडे, भूमकर वस्ती, वाकड या पाच ठिकाणी भविष्यातही वाहतुकीचे कोंडी होऊ नये यासाठी चांदणी चौकाप्रमाणे उपायोजना करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या सर्व कामांबरोबर बैठकीत चर्चा करण्यात आली.

या महामार्गाचे काम करणारी यापूर्वीची कंत्राटदार कंपनी न्यायालयात गेल्यामुळे काही अडचणी निर्माण झाले आहेत. ते कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवा रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था झाली असून त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी यावेळी दिले. त्यानुसार तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले व त्यानुसार ताबडतोब कार्यवाही सुरू केली आहे.