राष्ट्रीय एकता दिवसाची महापालिकेत शपथ

0
310

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित करू तसेच देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करू. आम्ही ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता आम्ही स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत, अशी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने घेण्यात आली.

भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच माजी उपपंतप्रधान केंद्रिय गृहमंत्री भारतरत्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने सामुहिक शपथही घेतली.

या कार्यक्रमाच्या वेळी मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, उप आयुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सनी कदम तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेक धाडसी निर्णय घेतले त्यामुळे त्यांना आयर्न लेडी म्हणूनही ओळखले जाते. इंदिरा गांधी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान तसेच पहिले गृहमंत्री होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन स्वातंत्र्यसाठी अभूतपुर्व योगदान दिले. त्यांना भारताचे लोहपुरूष म्हणूनही ओळखले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपुर्ण राज्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, त्यामुळे त्यांची जयंती ही राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते.

सूत्रसंचालन तसेच राष्ट्रीय एकता शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.