राष्ट्रहितासाठी काम करण्याचं आवाहन

0
362

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चा करत राष्ट्रहितासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. “हा कालखंड सध्या फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असून आगामी २५ वर्षात जेव्हा शतक साजरं होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा, किती वेगाने करावा, कोणती नवी उंची गाठावी याचा संकल्प करण्याचा आणि त्यासाठी संसद देशाला दिशा देईल,” असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. देशाला नवी ऊर्जा देण्याचं कारण ठरण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे असंही ते म्हणाले.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्यानेही विशेष महत्व आहे. याच कालखंडात देशाला नवे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मिळणार असून त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.“आम्ही नेहमीच सभागृहाला संवादाचं एक सक्षम माध्यम, तीर्थक्षेत्र मानत आलो आहोत, जिथे खुल्या मनाने संवाद होण्याची आवश्यकता आहे. गरज पडली तर वाद, टीका झाली पाहिजे. गोष्टींचं विश्लेषण झालं पाहिजे, जेणेकरुन धोरणं आणि निर्णयांमध्ये सकारात्मक योगदान करता येईल. सखोल आणि उत्तम चर्चा झाली पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांच्या प्रयत्नाने सभागृह चालतं, उत्तम निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याचा राष्ट्रहितासाठी वापर करुयात. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्यांच्या स्वप्नांना लक्षात ठेवत सभागृहाचा सर्वाधिक सकारात्मक उपयोग झाला पाहिजे,” असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.