प्राधिकरणात राष्ट्रहितार्थ महाआरती २०२५ उत्साहात संपन्न
पिंपरी,दि. १९ – ‘राष्ट्रहितार्थ काम करणारे देशभक्तच आहेत!’ असे ठाम मत ज्येष्ठ हिंदुत्ववादी संघर्षयोद्धा समीर कुलकर्णी यांनी श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी व्यक्त केले. श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट आयोजित ‘राष्ट्रहितार्थ महाआरती २०२५’ या सोहळ्यात समीर कुलकर्णी यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना कुलकर्णी बोलत होते. विधानपरिषद तालिका सभापती आमदार अमित गोरखे, भाजप पिंपरी – चिंचवड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे (ज्येष्ठांचा मानसपुत्र) आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
समीर कुलकर्णी पुढे म्हणाले की, ‘हिंदुधर्म हा शक्तीचा पूजक असून शक्ती ही संख्येत मोजली जाते. त्यामुळे हिंदू समाजाने एकत्र येऊन संख्याबळ वाढवावे ही काळाची गरज आहे. देव आणि मंदिर पूजनीय असून त्यासाठी मंदिर, मंडळ या माध्यमांचा विधायक वापर केला पाहिजे!’ अमित गोरखे यांनी, ‘श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट आणि प्राधिकरण परिसरातील अनेक संस्था एकत्रित येऊन, सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हिंदू समाजाला एकसंध करण्यासाठी अतिशय स्तुत्य प्रयत्न करीत आहेत!’ असे गौरवोद्गार काढले. ढोलताशा, बॅंडवादन आणि फटाक्यांची आतषबाजी करीत समीर कुलकर्णी यांचे मंदिर प्रांगणात भव्य स्वागत करण्यात आले. सुमारे दोनशे एकावन्न भगवाधारी नारींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. पंचामृताने चरणपूजन करून अत्तराचा वर्षाव केला; तसेच पाच सुवासिनींनी विधिवत औक्षण करून त्यांना मंदिरात महाआरतीसाठी पाचारण केले. रिमझिमत्या श्रावणसरींमुळे मंदिर प्रांगणातील जनसमुदाय अधिकच उत्साहित झाला होता.
श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टने सोहळ्याचे संयोजन केले. त्यामध्ये प्राधिकरणातील ऑक्सिजन पार्क ग्रुप, गणेश प्रभाग शाखा, चैतन्य हास्य क्लब, भगवान महावीर जैन समाज ग्रुप, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप, भूतपूर्व सैनिक संघ, सीरवी क्षत्रिय समाज, मित्र परिवार ग्रुप, श्रीराम प्रभाग शाखा, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, अखिल प्राधिकरण बचत गट महासंघ या संस्थांनी सहभाग घेतला होता. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात उपस्थिती दर्शवली. अक्षय मोरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.












































