महिला, युवा, शेतकरी, मुलीं साठीच्या योजनांचा प्रभावी प्रचार करणार…
बारामतीत १४ जुलैला जाहीर सभा ;विधानसभा निवडणूकीत सकारात्मकता यावरच भर..
अर्थसंकल्पाने जनतेचा आत्मविश्वास वाढला – सुनिल तटकरे
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – मुंबई, दि. ८ जुलै – विकासाचा दृष्टीकोन अन विकसित महाराष्ट्र ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेसमोर घेवून जायची आहे. आगामी विधानसभा निवडणूक आपल्या लोककल्याणकारी योजनांवरच आपण लढणार आहोत अशा स्पष्ट सूचना करतानाच अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महिला, युवा, शेतकरी, वारकरी, दुर्बल, आदिवासी, मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजासाठीच्या क्रांतिकारी योजना लोकांपर्यंत घेवून जा. असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत दिले.
महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील विशेष निमंत्रितांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
आगामी निवडणूकांमध्ये आपण जी रणनीती आखली आहे. जे काम हाती घेतलेय त्यावरच आपण जनतेच्या समोर जाणार आणि जिंकणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिनांक १४ जुलै रोजी बारामती येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची घोषणाही अजितदादा यांनी यावेळी केली.
आता आपण इतर बाबींकडे लक्ष देण्याऐवजी पहिल्यांदा लग्न निवडणूकीचे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून लढूया. असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.
आपण अर्थसंकल्पात कृषीपंपाच्या वीजबिल माफीचा निर्णय घेतला. तो अनेकांना आवडला आहे. महिलांसाठी दरमहा दीड हजार रूपये या योजनेचे राज्यभरात स्वागत होत आहे. बळीराजाला कायम मोफत वीज मिळेल यासाठी मागेल त्याला सौर कृषीपंप अशी योजना आपण आणली आहे. सौरऊर्जेचे हे धोरण शेतकर्यांनी आनंदाने स्विकारले आहे. बहिणींसोबत भावंडांनापण या विविध योजनांचा लाभ होणार आहे हे सत्य जनतेच्या समोर मांडा. असे आवाहन अजितदादा पवार यांनी यावेळी केले.
आपण आपल्या या योजनांचा प्रचार, प्रसार विधानसभा निवडणूकीच्या मतदानापर्यंत लावून धरायचा आहे. विरोधकांच्या कोणत्याही नकारात्मक प्रचाराला बळी न पडता आपण आपल्या सकारात्मक निर्णयावर जनतेच्या समोर जायचे आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले.
मनुस्मृती कदापि मान्य नाही..!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच लोकशाहीवादी आणि समतेची भूमिका जपणारा पक्ष आहे. असे सांगताना अजितदादा पवार यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार असेल तर तो आपल्या पक्षाला कदापि मान्य नाही. आपण कायमच मनुस्मृतीच्या विरोधात आहोत… आणि राहणार आहोत. शालेय शिक्षणमंत्री यांनी काही श्लोकांचा दाखला देत समर्थन केले असले तरी आपला पक्ष कधीही मनुस्मृतीला स्विकारणार नाही. असेही अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
अर्थसंकल्पाने जनतेचा आत्मविश्वास वाढला – सुनिल तटकरे
यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक या शब्दाला समर्पक असून आपले नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या या अर्थसंकल्पाने जनतेच्या मनात महायुती सरकारबाबतचा आत्मविश्वास वाढला आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूकांमध्ये आपला पक्ष केवळ चार जागेवर लढला. त्यामधे एक जागा आपण जिंकली. मात्र अजितदादांच्या सोबत असलेल्या आपल्या आमदारांच्या विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य दिले. लोकसभेत जे काही झाले ते झाले, असे सांगताना सुनिल तटकरे यांनी अजितदादा पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून विरोधकांना ‘एकही मारा लेकीन साॅलिड मारा’ अशी टिप्पणी करत उपस्थितांची दाद मिळवली. यंदाचा अर्थसंकल्प हा आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे लोककल्याणकारी ध्येय आहे. जनसामान्यांच्या प्रती असलेली ही भावना प्रत्यक्ष अर्थसंकल्पात धोरणांच्या रूपाने जाहीर करून राजकारणाच्या पलीकडील विकास आणि समाजकारण कसे असते याचे हे उदाहरण आहे. अशा शब्दात खासदार सुनिल तटकरे यांनी अर्थसंकल्पाचा गौरव करत अजितदादा पवार यांचे आभार मानले.
महायुती सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिलेदार म्हणून आपण अर्थसंकल्पातील सर्व योजनांचा सामान्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळेल यासाठी पुढील दोन महिने रात्रंदिवस कार्यरत रहा. असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.