राष्ट्रवादी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाजवली शिट्टी

0
347

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे चिंचवड विधानसभा पोटनवडणुकिसाठी प्रचारात अखेरपर्यंत दिसत नसल्याची चर्चा असतानाच त्यांनी शिट्टी वाजवत सरळ सरळ बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवजयंती निमित्त आयोजित शिवशाहि महोत्सवात बोलताना त्यांनी काम कऱणारा उमेदवार कसा पाहिजे हे सांगितले आणि मला शिट्टी वाजवण्याचा हक्क आहे, असे म्हणत राहुल कलाटे यांना मतदान कऱण्याचे अप्रत्यक्ष आवाहनच मतदारांना केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंथन शिबिर, बैठका, कार्यक्रमांना दांडी, त्याचवेळी पक्षाने बहिष्कार टाकलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मात्र हजेरी, रावसाहेब दानवेपासून अमित शहापर्यंतच्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे ते भाजपमध्ये जाणार इतपर्यंत बातम्या आलेल्या व त्यामुळे अनेकदा चर्चा झालेले खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा जोरदार चर्चेत आले आहेत. कारण त्यांच्या पक्षाने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारापासून ते जाणीपूर्वक चार हात दूर राहिल.

दिग्गज नेते चिंचवड आणि कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेले असताना फर्डे वक्ते आणि त्यामुळे लोकसभा गाजविणारे डॉ. कोल्हे हे या प्रचाराला न आल्याने त्याची मोठी चर्चा सध्या सुरु होती. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी ते पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. तरीही ते प्रचारात सामील झालेले नाहीत. शेवटपर्यंत ते प्रचारासाठी आले नाहीत, मात्र कलाटे यांनी जो व्हिडीओ व्हायरल केला आहे त्यात डॉ. कोल्हे यांनी उघडपणे कलाटे यांची तळी उचलल्याचे दिसते.

कार्यक्रमात बोलताना सुरवातीलाच ते शिट्टी वाजवतात आणि भाषणाची सुरवात करतात. ते म्हणतात,“शिट्टी वाजवणे माझा अधइकार मिळालेला असतो. जेव्हा आम्ही मतदार म्हणून रांगेत असतो तेव्हा प्रमुख पक्षाचे उमेदवार समोर असतात. तेव्हा सतसत् विवेकबुध्दी जागरुक पाहिजे. पक्ष प्रश्न सोडवायला येत नसतो ते उमेदवार सोडवत असतो. त्यावेळी सुजाण मतदाराने हा निर्णय केला पाहिजे की माझे प्रश्न कोण सोडवू शकतो. जो माझे प्रश्न सोडविण्याच व्हीजन ठेवतो, जो सर्वसमावेशक आहे, मग भले तो माझ्या पक्षाचा नसेल अशा योग्य उमेदवारालाच निवडूण दिले पाहिजे.“ कोल्हे यांच्या निवेदनानंतर कलाटे यांचा जयजयकार कऱणारे गाणे आणि शिट्टीचा आवाज सुरू होतो, अशी ही क्लिप प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात खूप व्हायरल झाली आहे.