– राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बहल यांच्या नावाची आग्रही मागणी
पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी सर्वात जेष्ठ म्हणून माजी महापौर योगेश बहल तर कार्याध्यक्षपदी माजी विरोधीपक्षनेते संतोष बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतचे तोंडी आदेश दिले. बारामती येथे निमंत्रीत केलेल्या सर्व माजी नगरसेवकांच्या बैठकित हा अत्यंत महत्वाचा निर्णय झाला. दरम्यान, बहेल यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून संधी देण्याची आग्रही मागणी बहुसंख्य माजी नगरसेवकांनी केली.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमिवर पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघातील माजी नगरसेवकांची विशेष बैठक स्वतः अजित पवार यांनी बोलावली होती. यावेळी पार्थ पवार यांच्यासह बहुसंख्य माजी नगरसेवक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी योगेश बहेल यांच्याकडे सुपूर्द करण्याची मागणी लावून धरली. अजितदादांनी त्याला तत्काळ होकार देत, बहल यांच्याकडे शहरातील पक्षाची धुरा सोपविली.
अजित गव्हाणे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. भोसरी विधानसभेतून त्यांना विधानसभा लढवायची होती आणि ती जागा महायुतीमध्ये भाजपकडे असल्याने त्यांची कुचंबना झाली होती. अखेर तीन महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षाला रामराम केला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात अजित गव्हाणे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी निश्चित झाली आहे. तेव्हापासून गेली तीन महिने दादांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळायला कोणी पुढे येत नव्हते. बहेल यांच्यासह जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, युवक आघाडीचे मयूर कलाटे यांची नावे चर्चेत होती. सर्वांनी बहेल यांच्या नावावर एकमत केल्याने त्यांच्याकडे अध्यक्षपद सुपूर्द करण्यात आले आहे.
पक्षाच्या कार्याध्यक्षपदी माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांची नियुक्ती करण्यात आली. संतोष बारणे हे थेरगाव येथून नगरसेवक होते, त्यांच्या पत्नी सौ. माया बारणे या दोन वेळा नगरसेवक होत्या. २०१२ राष्ट्रवादीतून आणि नंतर २०१७ मध्ये भाजपमधून माया बारणे या सदस्या होत्या. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संधी मिळणार होती, मात्र त्यांना डावलण्यात आले.
बहेल यांना विधान परिषदेवर संधी द्या –
दरम्यान, उपस्थित नगरसेवकांनी योगेश बहेल यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली. भाजपने शहरात दोन विधान परिषद आमदार दिले, मात्र आजवर राष्ट्रवादीतून एकालाही संधी मिळालेली नाही म्हणून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांनी सर्व सदस्यांचा मागणीचा निश्चित विचार करण्याची ग्वाही दिली.
माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, जगन्नाथ साबळे, काळुराम पवार यांच्यासह सर्वांनीच बहेल यांना आमदारकी मिळाली पाहिजे, अशी मागणी केली आणि अजितदादांनी त्यावर सहमती दर्शविली