राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले पत्र

0
665

-कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे, श्याम लांडे, जगदिश शेट्टी, राहुल भोसले, फजल शेख यांची वर्णी

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांची फेरनियुक्ती कऱण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते गव्हाणे यांना नियुक्तीचे पत्र मुंबई येथे विधीमंडळ कार्यालयात आज दिले. पक्षाच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, श्याम लांडे, जगदिश शेट्टी, राहुल भोसले आणि फजल शेख यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांना पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय गव्हाणे यांच्यासह शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. अजित पवार आणि नऊ आमदारांनी मंत्रीपदाची थपथ घेतली म्हणून त्यांचे अभिनंदन गव्हाणे यांनी प्रत्यक्ष भेटून केले होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचाच राग मनात ठेवून गव्हाणे यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, फजल शेख यांना मंगळवारी बडतर्फ केले होते. काल बडतर्फ कारवाई होताच आज तत्काळ अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्षाने नियुक्तीचे पत्र देऊन गव्हाणे आणि सर्व कार्याध्यक्षां सन्मान केला. श्याम लांडे यांना नव्याने या पदावर संधी देण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक नाना काटे, प्रसाद शेट्टी, पंकज भालेकर, श्याम लांडे, प्रभाकर वाघेरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांची माहिती घेतली तसेच अधिवेशन संपताच महापालिकेत एक स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. पक्ष संघटनेसाठी एक भव्य मेळावा त्याच दिवशी घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी गव्हाणे यांना दिले.