राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
175

रविवारी वाकी बुद्रुक येथे होणार रोजगार मेळावा
दि ६ जुलै (पीसीबी ) – तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सुधीर मुंगसे यांचा पुढाकार
आळंदी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, मी सेवेकरी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ७ जुलै ) बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे आयोजन मी सेवेकरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक सुधीर मुंगसे यांनी केले आहे.
वाकी बुद्रुक येथील साईकृपा मंगल कार्यालयात रविवारी ( दि.७ रोजी ) सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन या वेळात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार हे या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, काँग्रेसचे तालुका प्रमुख विजय डोळस, जिल्हा परिषद सदस्य संजय घनवट, अतुल देशमुख, बाबाजी काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल झरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
दहावी, बारावी पास आयटीआय, सर्वट्रेड, डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा ऑटोमोबाईल, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, बीएससी, बी. कॉम. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या १८ ते ३० या वयोगटातील गरजूंना या मेळाव्यात सहभागी होता येईल. हा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखती द्वारे निवडल्या गेलेल्या युवक युवतींना राज्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. आज वाढत्या बेरोजगारी मुळे तरुण मुले मुली नैराश्यग्रस्त होत आहेत. या तरुणांना नैराश्या मधून बाहेर काढून स्वतःच्या पायावर उभं करत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे उद्योजक सुधीर मुंगसे यांनी सांगितले. खेड तालुक्यात उद्योजक सुधीर मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधीर मुंगसे, हिरामण सातकर यांनी केले.