– भामा आसखेड जॅकवेल कामातील ३० कोटींची लूट थांबवा, निविद रद्द करण्याची आग्रही मागणी
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता खूप आक्रमक झाली आहे. भामा आसखेड धरणातील जॅकवेल कामाच्या सुमारे १२० कोटी रुपयांची निविदा १५१ कोटींना देण्याच्या कटकारस्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रहार केला. तब्बल ३० कोटी रुपयांची मलई खाऊ पाहणाऱ्यांमध्ये घबराट उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील असंख्य कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांना त्यांच्याच कार्यालयात घेराव टाकला आणि घोषणा देत परिसर हादरवून सोडला.
घेराव आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष नाना काटे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक वैशाली काळभोर, मयुर कलाटे, पंकज भालेकर, माया बारणे, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, विक्रांत लांडगे, अनुराधा गोफणे, शाम लांडे, सुलक्षणा शिलवंत, सतिश दरेकर, कविता खराडे तसेच शहर प्रवक्ते विनायक रणसुंभे, फजल शेख, देविदास गोफणे, दत्तात्रेय जगताप, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते घेराव आंदोलनात सहभागी झाले होते.
भामा आसखेडच्या जॅकवेल कामात दोनवेळा निविदा मागविण्यात आल्या आणि दोन्ही वेळा एकसारखे दोन कंत्राटदारांनीच निविदा भरल्या. मे. गोडवाना इंजि. व मे. टी.एन.टी आणि दुसरी मे. श्रीहरी असो. व मे. एसबीएम प्रोजेक्टस् अशा दोन कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. अनुभवाची अट पूर्ण करत नसल्याने मे. श्रीहरी असो व मे. एसबीएम या कंपनीला अपात्र ठरविण्यात आले.
अगदी कट रचल्यासारखे एका कंपनीला डोळ्यासमोर ठेवूनच हे काम देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मे. गोडवाना इंजि. व मे. टी.एन.टी या कंपनीलाच हे काम मिळाले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे या कंत्राटासाठी भाजपच्या एका आमदाराचा आटापीटा सुरू असल्याची खबर आहे. निविदा काढून तत्काळ वर्क ऑर्डर देण्याची प्रशासनाची घाई लक्षात आल्यावर या सर्व प्रकऱणाचा भंडाफोड झाला. तब्बल ३० कोटी रुपये जादा दराने निविदा मंजूर कऱण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी त्याबाबत आयुक्तांना लेखी पत्र दिले आणि ही निविदा रद्द करण्याची मागणी केली. या सर्व घडामोडी प्रशासनाची भूमिका आणि विशेषतः पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता यांची घाई काहिशी संशयास्पद वाटल्याने राष्ट्रवादीने आज त्यांनाच घेराव टाकला.
यावेळी बोलताना गव्हाणे यांनी प्रशानाला इशारा दिला. ३० कोटी रुपये करदात्यांचे लुटणाऱ्याना चाप लावण्याची मागणी त्यांनी केली. अवघ्या दोन निविदांमधून एक निविदा अंतिम कऱण्याच्या हालचालीत पाणी मुरत असल्याचे गव्हाणे यांनी काही कागदोपत्री पुराव्यांसह समोर आणले. निविदा रद्द करा अन्यथा आगामी काळात महापालिकेवर महामोर्चा आणायचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
घेराव आंदोलनानंतर सर्वांनी मिळून महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना एक लेखी निवेदन दिले आणि करदात्यांच्या पैशावरचा हा दरोडा थांबवा, निविद रद्द करा अशी मागणी केली.
दरम्यान, यावेळी आंदोलकांनी जोरजोरात घोषणा दत परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनामुळे राजकिय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.