राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0
1

दि.०४(पीसीबी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, त्याचबरोबर अजित पवार पालकमंत्री म्हणून लक्ष देत असलेले जिल्हे देखील सुनेत्रा पवार यांना देण्यात आले, पण आता प्रश्न आहे तो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा, पक्षाचं अध्यक्षपण कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, अशातच पक्षातील काही आमदारांनी सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं अशी मागणी केली आहे, याबाबत लोहा कंदारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माहिती दिली आहे.

विलीनीकरण करायचे की नाही याचा निर्णय त्यांनीच करावा
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सुनेत्रा पवार यांनीच व्हावी असे निवेदन आमदारांनी दिले आहे आणि त्या निवेदनावर माझी सुद्धा सही आहे, असे लोहा कंदारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे की नाही याचा निर्णय त्यांनीच करावा, तसेच विधिमंडळाच्या सदस्यांनी गटनेते म्हणून सुनेत्राताई पवार यांची निवड केली आहे असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान दोन दिवसांपासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल पटेल असतील अशा चर्चांना उधाण आलं होतं, त्यानंतर त्यांनी काल (मंगळवारी, ता ३) पत्रकार परिषदे घेत आपली भूमिका मांडली त्यामुळे आता पक्षातील नेत्यांच्या आणि आमदारांच्या मागणीनुसार, सुनेत्रा पवार अध्यक्ष होणार की दुसऱ्या कोणत्या नेत्यांला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही : पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर घेतला जाईल. पक्षाची धुरा एका योग्य व्यक्तीच्या हाती दिली जाईल. परंतु मी या शर्यतीत नाही. पक्षात शोकाचे वातावरण आहे. जे नेते आमच्या पक्षातही नाहीत ते आमच्या पक्षाच्या भूमिकेवर उलटसुलट प्रश्न उपस्थित करीत आहेत. उपमुख्यमंत्री पद जास्त काळ रिक्त राहू शकत नाही म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली असल्याचेही ते म्हणाले.

पक्षाला योग्य दिशा दाखविण्याची गरज
मी अजितदादांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. पक्षाध्यक्ष पदाचा निर्णयही आपल्याला घ्यायचा आहे. येत्या काळात ती प्रक्रिया पूर्ण होईल. मी कार्याध्यक्ष आहे. यामुळे पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आमच्या पक्षात कोणाला अध्यक्ष बनवावे, कोणाला अध्यक्ष बनवू नये यावर बाहेरचे लोक चर्चा करत आहेत. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा हा प्रकार आहे. सध्या पक्षाला योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे, असेही पटेल म्हणाले