राष्ट्रवादी काँग्रेसला एकनाथ शिंदे गटाचा धक्का

0
339

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडली. ४० आमदारांसोबत बाहेर पडून सत्ता स्थापन केली. आता एकनाथ शिंदेंनी आपला मोर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे  वळविल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय अशोक गावडे यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गावडे यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

अशोक गावडे यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, गावडे यांनी पक्षातून बाहेर पडताच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई युनिटने या लोकांचा हस्तक्षेप वाढवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे, या सगळ्याचा मी अनेक दिवसांपासून सामना करत आहे.याबाबत वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, मात्र लक्ष दिले जात नाही, असे गावडे म्हणाले. ‘या गटबाजीला कंटाळून मी आज राजीनामा देत आहे, असे नाही,’ असे गावडे यांनी सांगितले.

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी येऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे.

याशिवाय सामजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष सरिता कांबळे, माजी शिक्षण मंडळ समिती सदस्य अजित सावंत, जिल्हा सरचिटणीस दिलीप सिंह, सामजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, शिवाजी गावडे, उपशहर अध्यक्ष राज नायर यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आपला पाठींबा जाहीर केला.

“नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास मंत्री असताना अनेक निर्णय घेतले असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. यापुढेही नवी मुंबईतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना न्याय देऊ,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.