पिंपरी दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांसह सूरतमध्ये तळ ठोकला आहे. हा राजकीय भूकंप फक्त शिवसेनेपुरता मर्यादित नसून राष्ट्रवादी काँग्रेसलाही याची झळ बसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील असल्याची चसुरू आहे. राज्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. आज दुपारी या दोन नेत्यांमध्ये मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती आहे.
सोमवारी रात्री, विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह मुंबई सोडली. विधान परिषद निवडणुकीत मते फुटली असल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी अवघे १९ आमदार उपस्थित होते. यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली होती.
मध्यरात्रीनंतर वर्षावर खलबतं
शिवसेना आमदार नॉटरिचेबल असल्याचे समोर आल्यानंतर मध्यरात्रीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही बैठक पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही तासात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीत झटका बसल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत.