राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या

0
124

अरुणाचल प्रदेशातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ३ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्यासह पक्षाचे प्रभारी मोहित पाटील आणि पूर्वोत्तर समन्वयक संजय प्रजापती यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

अरुणाचलप्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार निकील कामीन, लेखा सोनी आणि टोकू टाटम हे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील असे सांगतानाच यावेळी मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी या विजयाचे श्रेय अरुणाचल प्रदेशातील पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांच्या प्रयत्नांना दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकूण १०.०६ टक्के मते मिळाल्याचे सांगतानाच ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी विधानसभा निवडणूक लढवणे हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरील विश्वास, दूरदृष्टी आणि अरुणाचल प्रदेशासमोरील गंभीर समस्या सोडविण्याची क्षमता दाखवत आहे. आम्ही पुढील पाच वर्षांसाठी नवीन विधानसभेची स्थापना करणार असून पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक प्रशासनाची तत्त्वे कायम ठेवण्याचा संकल्प केल्याचेही सांगितले.

अजितदादा पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आणि संपूर्ण सामाजिक, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी समर्पित काम करत आहे. सर्वसमावेशक शासन आणि प्रगतीशील धोरणांसाठी वचनबद्धतेसह, राष्ट्रवादी काँग्रेसने भारतातील सर्व नागरिकांसाठी चांगले भविष्य घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले