भोसरी, दि. 4 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी राहील. त्यामुळे बारणे यांचे मताधिक्य दुपटीपेक्षा अधिक वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.
शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) भोसरी येथे अजित गव्हाणे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. गव्हाणे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिवसेना व कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, विजय फुगे, सचिन आवटे, पै. अमर फुगे, राजेंद्र तरस आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व खासदार बारणे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेना-भाजप युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी झाल्याने महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना खासदार बारणे यांच्या विक्रमी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील, असे गव्हाणे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही महायुती केली आहे. त्यामुळे राज्याच्या प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू आहे. विकासाला अधिक गती देण्यासाठी महायुतीमधील मित्र पक्षांचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत, ही खूप आनंदाची व समाधानाची बाब आहे, अशा भावना खासदार बारणे यांनी व्यक्त केल्या.
प्रचारात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.