राष्ट्रवादी काँग्रेसचा वजीर ४० आमदारांसह गायब होणार होता, पण…

0
183

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा मंगळवारी शरद पवार यांनी केली. शरद पवार यांच्या घोषणेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेना ( शिंदे गट ) आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर ४० आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असं महेश शिंदे यांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“शरद पवार हुशार आहेत. त्यांना कळलं होतं की, वजीर निघून चालला आहे. त्यामुळे आख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. थोड्या दिवसांनी हे होणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न नाही. पण, शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत,” असं महेश शिंदे म्हणाले.

अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले? जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राष्ट्रवादीतून मुख्यमंत्रीपदासाठी दोघेजण इच्छूक आहेत, याबद्दल विचारल्यावर महेश शिंदेंनी सांगितलं, “महाराष्ट्रात प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. एका घरात दोन मुख्यमंत्री कसं होणार हा मोठा प्रश्न आहे. ज्याची क्षमता आहे, त्याने मुख्यमंत्री होण्यास हरकत नाही.”

शरद पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणावर काय परिणाम होणार? असा प्रश्न विचारल्यावर महेश शिंदे म्हणाले, “ज्या जमिनीवर उभा होतो, ती जमीनच विकली गेलेली आहे, हे आता त्यांना कळलं आहे. जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे.”

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेबद्दल विचारलं असता महेश शिंदेंनी म्हटलं, “महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ होतीच कुठं? ‘वज्रमूठ’ करण्यासाठी अंगात ताकद लागते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी वज्र आणि मूठ दोन्ही गायब केलं आहे. फक्त केविलवाणा प्रयत्न चालू आहे.”