राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचा कोणताही पुरावा नाही,

0
398

पिंपरी,दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती.त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उत्तर देण्यास सांगितले होते. यावर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर केलेला दावा फेटाळण्याची विनंती शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यांनी केलेली मागणी ‘दुर्भावनापूर्ण’ आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे म्हटले आहे.

खरी राष्ट्रवादी कोणाची?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाप्रमाणेच अजित पवार गटानेही खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. कारण त्यांना पक्षाच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आले की अजित पवार यांची 30 जून 2023 च्या ठरावाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावर पक्षाच्या सदस्यांचे बहुमत असल्याची स्वाक्षरी आहे.

शरद पवार गटाच्या याचिकेत काय आहे?
शरद पवार गटाच्या याचिकेत सांगण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद असल्याचे अजित पवार प्रथमदर्शनी दाखवू शकले नाहीत. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट यांच्यात कोणताही वाद आहे हे देखील निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी मान्य केले नाही. 01.07.2023 पूर्वी, अजित पवार यांनी शरद पवार/राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात कोणतीही तक्रार केली नाही किंवा त्यांनी शरद पवार किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतर कोणत्याही नेत्याला बैठकीची विनंती केली नाही.