छत्रपती संभाजीनगर, दि. २२ जून (पीसीबी) – मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. आता अजित पवार यांनी स्वत: पक्षातील जबाबदारी मिळावी आणि विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. दादांची घुसमट होत असल्याची चर्चा जोरात आहे.
अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. विरोधी पक्षनेते पदाची मोठी जबाबदारी असताना, या पदावर काम करायचं नाही, असं अजित पवार म्हणतायत, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होतेय, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा” अजित पवारांच्या या वक्तव्याबद्दल विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “अजित पवारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मला आता विरोधी पक्षनेतेपद नको, मला पक्षाचं काम द्या, अशी विनवणी अजित पवारांनी पक्षाकडे केली आहे. अजित पवारांची ही विनंती अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखी आहे.”
“एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याकडे विरोधी पक्षनेत्यासारखं मोठं पद असूनही तो म्हणतो की, मला या पदावर काम करायचं नाही. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची (अजित पवार) जास्त घुसमट होतेय, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय. हे माझं मत नाही, राष्ट्रवादीमध्ये त्यांना योग्य न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे,” असंही शिरसाट यांनी नमूद केलं.