राष्ट्रवादीतील डॅमेज कंट्रोलसाठी अजितदादा उद्या शहरात

0
129
xr:d:DAFb06I1LDs:39,j:4551772165,t:23030114

– सकाळी ७ ते १० भूमीपूजन, उद्घाटने, सांगवीत होणार जाहीर सभा
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील १५ माजी नगरसेवकांनी वेळप्रसंगी तुतारी हातात घेण्याचा दिलेला इशारा तसेच चिंचवडच्या जागेवरुन निर्माण झालेल्या प्रश्नामुळे पक्षातील खदखद वाढल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शहरातील अस्तित्वालाच धोका निर्माण होत असल्याने अजितदादांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. दरम्यान, ही पडझड रोखण्यासाठी महापालिकेची भूमिपूजन आणि उद्घाटनांचे निमित्त करून ते उद्या (बुधवारी) सकाळी ७ ते १० पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर येत आहेत. नवी सांगवी येथील स्वर्गीय निळू फुले नाट्यगृहात समारोप सभा होणार आहे. आता निवडणुकिसाठी दादा तिथे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विधानसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंचवडच्या जागेसाठी तीव्र असंतोष उफाळून आला आहे. मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे या माजी नगरसवेकांनी आठवड्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन चिंचवडच्या जागेची मागणी केली. आम्ही भाजपचा प्रचार कऱणार नाही अन्यथा वेळप्रसंगी तुतारी हातात घेऊ असा इशाराही दिला होता. महायुतीच्या जागावाटप नियमानुसार ही जागा भाजपकडे आहे. मतदारसंघाच भाजपपेक्षा राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याचा माजी नगरसेवकांचा दावा आहे. त्यासाठीच ही जागा सोडावी अन्यथा सरळ शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याचा इशारा त्यांनी दिला. प्रत्यक्षात सर्वांनी मिळून शरद पवार यांची भेटसुध्दा घेतल्याने हे प्रकरण आणखी तापले आहे.

भाजपच्या ताब्यातील ही जागा राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मागितल्याने भाजपचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांनी पक्ष कार्यालयात बैठक घेऊन आम्ही राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असे म्हणत त्यांनीसुध्दा पिंपरी राखीव या राष्ट्रवादीच्या जागेवर दावा केला. हा संघर्ष वाढत गेल्याने महायुतीच्या चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तीनही जागांना धोका संभवतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी सर्व नगरसेवकांना बारामतीत बोलावले होते. तिथेही सर्वांनी ती भूमिका कायम ठेवल्याने हवा गरम आहे. चिंचवडची जागा घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दादांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.
प्रत्यक्षात वास्तव काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी आता दौऱ्याचे निमित्त केले असून त्यात ते चाचपणी करणार आहेत.
सकाळी ७ ते १० असा हा धावता दौरा आहे. बोपखेल ते खडकी पूल, सांगवी ते बोपोडी पूल आणि पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पूल अशा नवीन प्रकल्पांचे उद्घाटन ते कऱणार आहेत.