पिंपरी, दि. ३० – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खंद्या समर्थक माजी महापौर अपर्णा डोके यांनी आयत्यावेळी भाजमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी अर्जसुध्दा दाखल केला. भाजपमध्ये त्यांना उमेदवारी देण्यास कडवा विरोध होता म्हणून अगदी शेवटच्या काही तासात त्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म दिला आणि राष्ट्रवादीला चकवा दिला.
चिंचवडगावातून भाजपने माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अपर्णा डोके आणि योगेश चिंचवडे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. आमदार शंकर जगतपा यांचे उजवे हात समजले जाणाऱ्या माजी नगरसेवक राजू गावडे यांना तसेच शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षातही नाराजीचा सूर आहे.
माजी महापौर अपर्णा डोके या सलग तीन टर्म नगरसेविका आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या त्या कट्टर समर्थक होत्या. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवडगावात केवळ काम आणि लोकसंपर्क असल्याने त्या विजयी होत आल्या. भाजपमध्ये त्या प्रवेश करणार हे अपेक्षित होते.












































