राष्ट्रवादीच्या बडे पाच नेते ‘ईडी’च्या रडारवर

0
367

पंढरपूर, दि. १८ (पीसीबी) : राष्ट्रवादीच्या बड्या पाच नेत्यांची लवकरच ‘ईडी’कडून चौकशी होणार आहे, अशी खळबळजनक माहिती माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज येथे दिली. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सलग तीन ट्वीटद्वारे सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि ईडी कारवाईचे सुतोवाच नुकतेच केले. पाठोपाठ खासदार निंबाळकर यांनीही ईडी कारवाईची वाच्यता केल्याने खळबळ आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून सरकार वाचविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा ही खासदार निंबाळकर यांनी केला आहे.खासदार निंबाळकर यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खासदार निंबाळकर आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

दोन दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या दहा पैकी पाच नेत्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पाच बडे नेते कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे.राष्ट्रवादीमध्ये अनेक चोर आहेत त्यातील कोणता चोर नेता आहे, हे देखील लवकरच समोर येणार आहे. लवासा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बारा वर्षानंतर समन्स बजावले आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले असेल तर यातून मोठा घोटाळा बाहेर येईल, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.