राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय भाजपाने लाटावे हे दुर्देव- राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा टोला

0
320

– उपमुख्यमंत्रीसाहेब पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घाला

पिंपरी, दि. 15 :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय भाजपच्या नेत्यांनी लाटावे हे दुर्देव आहे. उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन आणि उद्घाटने करण्यात आली त्यातील अनेक कामे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे बदनाम झाली आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी उद्घाटने आणि भूमीपुजने करतानाच महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळाही घालावा, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी लगावला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या काही कामांचे उद्घाटन तर नव्याने हाती घेण्यात आलेल्या काही कामांचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. 15) करण्यात आले. याबाबत अजित गव्हाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याबाबत गव्हाणे यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, नेहरूनगर येथील नविन शाळा, ग. दि. माडगुळकर सभागृह, तारांगण प्रकल्प, चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्प ही कामे राष्ट्रवादीच्या काळातच हाती घेण्यात आली होती. त्या कामांचे उद्घाटन आज करण्यात आले.

या कामांचे श्रेय लाटण्याच्या उद्देशाने स्थानिक एकाही माजी लोकप्रतिनिधीला साधे निमंत्रणही देण्यात आले नाही, ही दुर्देवी बाब आहे. भाजपकाळात हाती घेण्यात आलेल्या काही कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले आहेत, यातील बहुतांश कामे ही भाजप नेत्यांनी आणि ठेकेदारांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे बदनाम झालेली आहेत. जॅकवेलच्या कामात थेट जनतेच्या तीस कोटी रुपयांची लुट करण्यात आलेली आहे. अशा कामांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस करत असल्यामुळे ते भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत असल्याचाच संदेश शहरवासियांमध्ये गेलेला आहे. भ्रष्टाचारातून करण्यात आलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्यापेक्षा महापालिकेतील भाजप नेत्यांची ठेकेदारी, भ्रष्टाचार आणि टक्केवारी बंद करा, अन्यथा येथील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.

कर्नाटकप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही सत्ताबदल कर्नाटकातील सुजान जनतेने चाळीस टक्के कमीशन खाणारे भाजप सरकार सत्तेतून हद्दपार केले आहे. भाजपचा जातीयवादी आणि भ्रष्ट चेहरा जनतेसमोर उघडा पडला आहे. देशामध्ये राजकीय वार्‍याची दिशा बदलण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रात आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्ताबदल नक्कीच होणार आहे. पिंपरी-चिंचवडची जनता भाजपच्या भ्रष्ट कारभारास विटली असून येणार्‍या महापालिका निवडणुकीत येथील जनता भाजपला सत्तेतून हद्दपार करेल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे अत्यंत आजारी असताना देखील आपला जीव धोक्यात घालून भाजपच्या उमेदवारांना मुंबई येथे मतदान करण्याकरीता गेले होते. त्याच लक्ष्मण जगताप यांनी जॅकवेलच्या निविदेत 25 ते 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता व ही निविदा रद्द करावी, अशी मागणी तत्कालीन आयुक्त यांच्याकडे केली होती. ज्या आमदारांनी भाजपसाठी शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठा कायम राखली त्याच आमदारांनी आरोप केलेल्या कामाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे उद्घाटन फडणवीस यांनी केले नसते तर जगताप यांच्या पवित्र आत्म्यास समाधान वाटले असते, असेही गव्हाणे यांनी या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.