राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी आज होणार जाहीर

0
64

मुंबई, दि. 21 (पीसीबी) : महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी कधी जाहीर होणार याची माहिती समोर आली आहे.

काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी झाली. या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर आता विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर केल्या जात आहेत. आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याचा मुहुर्त ठरला आहे.
कोणकोणत्या उमेदवारांचा पत्ता कट होणार?

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होणार आहे. या यादीत विद्यमान आमदारांची नावे असण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार गटाची पहिली यादी ही फक्त 32 ते 35 उमेदवारांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या यादीत कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणकोणत्या उमेदवारांचा पत्ता कट होणार हे लवकरच समोर येणार आहे.
एबी फॉर्म वाटप

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी उमेदवारी निश्चित झालेल्यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. आज सकाळीच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना बोलवण्यात आले होते. यात संजय बनोसेडे, राजेश विटेकर, चेतन तुपे यांसह उमेदवारी निश्चित झालेले आमदार हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. अजित पवारांच्या हस्ते यादी जाहीर करण्यापूर्वीच उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करण्यात आले.
अजित पवार गटाची पहिली यादी आज

यावेळी वडगाव-शेरी चे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे देखील देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते. या सर्वांना एबी फॉर्मचेही वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष त्या यादीकडे लागले आहे.