राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे संभ्रम वाढविणारे ट्विट

0
268

– गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत… याला निसर्गाचा नियम म्हणायचं की सगळीकडेच असं असतं? आयुष्य, करिअर, राजकारण…

मुंबई, दि. ३ (पीसीबी) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे मागील काही काळापासून सातत्याने आपल्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत आहेत. केंद्रासह राज्यातील भाजप नेत्यांसोबत वारंवार होणाऱ्या भेटीगाठी आणि सूचक राजकीय वक्तव्यांमुळे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र स्वत: खासदार कोल्हे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. अशातच अमोल कोल्हे यांनी आज केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरून पुन्हा नव्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

‘जोपर्यंत गती आहे तोपर्यंत चक्र एकाच दिशेने भासतात, पण गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत. याला निसर्गाचा नियम म्हणायचं की सगळीकडेच असं असतं? आयुष्य, करिअर, राजकारण…गती कमी झाल्यानंतर दिशा कळते,’ अशा मजकुरासह अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक
एकीकडे राष्ट्रवादीतील नाराजीची चर्चा आणि भाजप नेत्यांसोबत वाढलेल्या जवळीकीबद्दल चर्चा होत असतानाच राजकारणाचा उल्लेख करत अमोल कोल्हे यांनी दिशेबाबतचा संभ्रम व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खासदार म्हणून संसदेत निवडून गेल्यानंतर वारंवार केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडणारे अमोल कोल्हे हे मागील काही महिन्यांपासून विविध भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं दिसत आहे. कोल्हे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगनिमित्त ही भेट घेतल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. मात्र नंतरच्या काळातही महाराष्ट्र भाजपमधील विविध नेत्यांना ते भेटत राहिले. तसंच पुढील राजकीय प्रवासाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेचीही चांगलीच चर्चा झाली होती.

‘मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही, वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असतं,’ असं सूचक वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार हे एका आंदोलनानिमित्त अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळीही कोल्हे यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली होती.

नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमोल कोल्हे यांनी मात्र आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं सांगितलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण नाराज असण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे मी कोणत्याही कारणास्तव नाराज नाही. मी नाराज असेल तर थेट शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी बोलू शकतो,’ असं कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.