राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे तोंडघशी

0
318

– ना कुठली बैठक ना कुठे सह्यांची मोहिम, अजित पवारांनीच केले स्पष्ट

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – राज्यातील राजकीय घडामोडीत स्वतःचे महत्व वाढवू पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे अक्षरशः तोंडावर आपटले. सोमवारी माध्यमांशी बोलताना “मी मुंबईला निघालोय, सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे, तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल“ असे म्हणत आमदार बनसोडे यांनी अजित पवार भाजप बरोबर जाणार असल्याच्या बातम्यांना हवा दिली. प्रत्यक्षात खुद्द अजित पवार यांनीच या सर्व बातम्या खोट्या आणि माध्यमातून पेरलेल्या आहेत, अशी कुठली बैठक मी बोलावलेली नाही, असा स्पष्ट खुलासा केल्याने आमदार बनसोडे यांचा उतावळेपणा उघड झाला.

राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव आमदार असल्याने बनसोडे यांना माध्यमांनी छेडले होते. त्यावेळी उतावीळपणे बोलताना,“आपण पहिल्यापासून अजित पवार यांचे खंदे समर्थक आहोत, निष्ठावंत आहोत. ते जिकडे जातील तिकडे मी जाणार, असे छातीठोकपणे सांगितले. दादांनी आमदारांची बैठक बोलावली आहे मी मुंबईला निघालोय. लवकरच तुम्हाला गोड बातमी कळेल“ असेही बनसोडे म्हणाले होते. त्यामुळे तमाम माध्यमांनी त्यांना गाठले आणि अजित पवार यांच्याबाबत खोदून खोदून विचारले.

आज मंगळवारी सकाळी मुंबईत पुन्हा आमदार बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याहीवेळी पत्रकारांनी ४० आमदारांच्या सह्या झाल्यात, ते सर्व दादांच्या बरोबर आहेत, तुमचे काय म्हणून विचारणा केली असता, अहो ४० नाही त्यापेक्षा अधिक आमदार दादांच्या बरोबर आहेत, असे आमदार बनसोडे यांनी ठोकून दिले. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आणि पिंपरी चे आमदार बनसोडे या दोन आमदारांच्या विधानांमुळे बातम्यांचे पेव फुटले आणि मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याच्या बातम्या आणखी फूलत गेल्या.

खुद्द अजित पवार यांनी या सर्व बातम्यांबाबत आज सविस्तर खुलासा केला. त्यावेळी, सर्व बातम्या तद्दन खोट्या असल्याचे स्वतः दादांनी स्पष्ट सांगितले. आमदारांच्या सह्यांची मोहिम किंवा बैठक वगैरे काहीही नाही. मी कोणतीही बैठक बोलावली नाही, असेही अजितदादांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले. भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांवरही त्यांनी साफ इन्कार केला. जिवंत असे पर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांच्या या खुलाशामुळे आमदार बनसोडे यांची अक्षरशः फजिती झाली. प्रसिध्दीसाठीचा उतावळेपणा त्यांच्या अंगलट आला. अधिकृत कोणतीही माहिती नसताना केवळ मोठा आव आणून माध्यमांना दिलेली त्यांची माहिती तद्दन खोटी असल्याचे उघड झाल्याने आमदार बनसोडे तोंडावर आपटले, अशी चर्चा आहे.