पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा पहिलाच पिंपरी चिंचवड शहर दौरा शुक्रवारी होत आहे. आगामी निवडणुकांसाठी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रश्नांवर सकाळी ११ महापालिका भवनात बैठक होणार आहे. दुपारी २ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून अजितदादा त्यांच्या लाडक्या पिंपरी चिंचवड शहराकडे फिरकलेच नाहीत, अशा बातम्या झळकल्या होत्या. भाजपने अजितदादांना या शहरात लक्ष घालण्यास बंदी घातली अशाही अफवा होत्या. शहराच्या महत्वाच्या विषयांत दादा आता लक्ष देत नाहीत, ते काम भाजप आमदारांकडे सुपूर्द केले आहे, अशीही राजकीय चर्चा होती. दरम्यान, आता खुद्द अजितदादा शहरातील कार्यकर्त्यांना वैयक्तीक भेटणार आणि जाहीर मेळावा घेणार असल्याने त्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे स्पष्ट झाले.
अजित पवार यांचे उद्या सकाळी ९.४५ वाजता मुकाई चौकात रावेत येथील नागरिकांच्या वतीने जंगी स्वागत होणार आहे. नंतर १० वाजता वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी चौकात स्वागत, पुढे सव्वा दहा वाजता चिंचवडच्या चापेकर चौकात, साडेदहा वाजता चिंचवड स्टेशन चौकात आणि नंतर मोरवाडी येथील चौकात स्वागत होणार आहे.
सकाळी ११ वाजता महापालिका भवनात विविध प्रश्नांवर अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित बैठकीचे आयोजन केले आहे. २०१७ पासून महापालिकेत भाजपची सत्ता असताना मोठ्या प्रमानावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. अजित पवार भाजप बरोबर सत्तेत गेल्यानंतर सगळ्या प्रकऱणांवर राष्ट्रवादी गप्प बसल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते. आता या सगळ्या प्रकऱणांचा आढावा स्वतः अजित पवार हेच घेणार असून प्रशासकीय कारकिर्दीत गेल्या वर्षभरात जी संशयास्पद कामे आहेत त्याबाबत जाब विचारणार आहेत, असे समजले.
उपमुख्यमंत्री पदावर पाचव्यांदा निवड झाल्या निमित्त शहरर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुपारी दोन वाजता नाट्यगृहात अजित पवार यांचा गौरव होणार आहे.











































