राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

0
254

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अडचणीत सापडल्या आहेत. १८ ऑगस्टला मतदान होणार असून १९ ऑगस्टला निकाल लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते, मात्र आता ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बॅकफूटवर आहे. त्यामुळे वेळेवर निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. अशातच काँग्रेस राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

“ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे”, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

“राज्यातील ९२ नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असल्या, तरी माझ्या मतदार संघातील परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना २७% जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत बहाल केले जावे, ही आमची भूमिका आहे व राहील”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.