दरम्यान, पुणे विमानतळावर राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेल्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळून आले. पुणे ते वाराणसी या प्रवासादरम्यान विमानतळावरील सुरक्षा चौकशीदरम्यान ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवाना केवळ महाराष्ट्रापुरता वैध
सोलापूर जिल्ह्यातील गादेगाव येथील नेते चंद्रकांत प्रभाकर बागल यांच्या विरोधात विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. स्क्रिनिंग पॉइंटवर त्यांच्या सामानात भारतीय बनावटीचा रिव्हॉल्वर, पाच जिवंत काडतुसे आणि एक रिकामे काडतूस आढळून आले. दरम्यान, चौकशीत उघड झाले की बागल यांच्याकडे या शस्त्राचा परवाना आहे, मात्र तो परवाना फक्त महाराष्ट्रापुरता वैध आहे.
वाराणसीला प्रवास करताना त्यांनी आवश्यक ती परवानगी न घेतल्याने हे उल्लंघन झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासानंतर त्यांचे शस्त्र जप्त करण्यात आले असून त्यांना चौकशीसाठी नोटीस देऊन पुढील प्रवासा परवानगी देण्यात आली.
संबंधित व्यक्तीला सीआयएसएफ व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले होते. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिले. त्यांनी सरकारने आखून दिलेल्या शस्त्र परवाना नियमावलीचे व अटी-शर्तीचे उल्लन्घन केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते कुटुंबीय व अन्य लोकांसोबत वाराणसी येथे निघालेले होते. त्यांना चौकशीसंबंधी नोटीस दिली असून पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. ते वाराणसी येथे गेले आहेत. अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी दिली आहे.














































