राष्ट्रपती भवनात अच्युत पालव यांची सुलेखनकला झळकली….

0
2

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील “ग्रंथ कुटीर” या दालनाचे उद्घाटन नुकतेच झाले. या दालनामध्ये भारतातील ११ अभिजात भाषांमधील पुस्तके आणि हस्तलिखितांचा समावेश करण्यात आला आहे.


या ग्रंथ कुटीर दालनातील एका भिंतीवर ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांनी “हम भारत के लोग” हा मजकूर भारताला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या असामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पाली, प्राकृत, संस्कृत, तामिळ आणि तेलुगू या ११ भाषांमध्ये सुलेखनातून साकारला आहे.
याशिवाय “या कुन्देन्दु तुषार हार धवला…” या सरस्वती वंदनेचाही या दालनात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व सुलेखन प्रत्येकी ४ फूट x ४ फूट आकाराच्या कॅनव्हासवर करण्यात आले आहे.
भारतीय सुलेखनाच्या दृष्टीने पाहिले असता, या उपक्रमामुळे सुलेखन कलेला जणू राजाश्रय मिळाल्याचे दिसून येते. यामुळे सुलेखनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या असंख्य कलाकारांचे मनोबल आणि काम करण्याचा उत्साह नक्कीच वाढेल, असे मत सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केले.
सुलेखन क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने नुकताच त्यांना “पद्मश्री” पुरस्काराने गौरविले आहे. तसेच अलीकडेच CBSE,SB (इयत्ता ८ वी) च्या मराठी पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी अच्युत पालव यांच्यावर स्वतंत्र धडाही समाविष्ट करण्यात आला आहे.