नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) : देशात राष्ट्रपती निवडणूक पदासाठी येत्या 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर देशात विरोधी पक्षांसह भाजप मध्येही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षातील उमेदवाराच्या नावावर एकमत करण्यासाठी पहिली बैठक घेणार आहेत. दरम्यान, पहिल्याच बैठकिकडे बहुसंख्य विरोधकांनी पाठ फिरवल्याने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकिआधीच फूट पडली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यास विरोध केल्यानंतर आता विरोधी पक्षांकडून आता नव्या नावावर विचार सुरू आहे. डाव्या पक्षांनी राष्ट्रपती पदासाठी महात्मा गांधी यांचे नातू गोपाल कृष्ण गांधी यांचं नाव सूचवलं आहे. पण गोपाल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे.
डाव्या पक्षांच्या नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा केली त्यावेळी गोपाल कृष्ण गांधी यांना राष्ट्रपती करण्यासाठीची चर्चा झाली. पवारांनीही डाव्या पक्षांनी सुचवलेल्या या नावाला विरोध केला नाही. त्यानंतर आज होणाऱ्या विरोधकांच्या होणाऱ्या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी गोपाल कृष्ण गांधी यांचे नाव सूचवलं जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ही विशेष बैठक बोलावली होती. त्यावेळी काही नेत्यांनी गोपाल कृष्ण गांधी यांच्याशी संपर्क साधला होता.
2017 मध्ये गोपाल कृष्ण गांधी हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. पण, भाजपचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा पराभव केला. आता राष्ट्रपती पदाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गोपाल गांधी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी त्यांना विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची विनंती केली. त्यावर गांधी यांनी विचार करण्यासाठी बुधवारपर्यंतचा वेळ मागितला. गोपाल गांधी हे 2004 ते 2009 दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी इतर नेत्यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
गोपाल गांधी यांनी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणून काम पाहिलं आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची बैठक बोलावली. पण माकपा आणि भाकपाने ममता बॅनर्जी यांच्या या एकतर्फी निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पण तरीही आम्ही या बैठकीला आमच्या खासदारांना पाठवू, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आज होणाऱ्या बैठकीला माकपचे नेते ई. करीम उपस्थित राहणार आहेत. तर सीताराम येचुरी यांनी याबाबत ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून अशा प्रकारची बैठक बोलावण्याचा निर्णय एकतर्फी आणि आपत्तीजनक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.