राष्ट्रपती पदासाठी जनरल व्हि. के. सिंह यांचेही नाव आघाडीवर

0
384

– आरिफ मोहम्मद खान, मुख्तार आब्बास नक्वी,द्रौपदी मुर्मू, अनुसूया उईके यांची नावे स्पर्धेत

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) : केंद्रातील मोदी सरकारने नव्याने आणलेल्या अग्निपथ सैन्यभरती योजनेला देशभरात सध्या प्रचंड विरोध सुरु आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या १० राज्यांसह आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही या विरोधाच्या ठिणग्या उडाल्या. तरूणांचा या योजनेला असलेला तीव्र विरोध मोदी सरकारच्या वरिष्ठ वर्तुळात काळजी वाढविणारा ठरला आहे. यामुळे शेतकरी आंदोलनासारखीच या योजनेचीही गत होऊ नये यासाठी भाजपकडून ‘आपत्ती निवारण’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.

याच वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदासाठी ‘मनात घोळणारे‘ नाव एनवेळी बाजूला सारून एखाद्या निवृत्त लष्करी उच्चाधिकाऱ्याला या पदाची लॉटरी लागू शकते अशी कुणकूण लागली आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वोच्च घटनात्मक पदसाठी सत्तारूढ उमेदवाराचा निर्णय पंतप्रधान मोदी लवकरच घेणार आहेत. यात माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

व्ही. के. सिंह सध्या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. २०२४ मध्ये ते सत्तरीच्या पुढे जाणार असल्याने त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. अग्निपथ विरोधातील अग्नीज्वाळांत सरकारची बाजू सावरून घेण्यासाठी तिन्ही सैन्यप्रमुखांना व उपप्रमुखांना आज मैदानात उतरविण्यात आले. याशिवाय महिंद्रा, टाटा एल अँन्ड टी यासारख्या उद्योगांनीही सेवामुक्त अग्निवीरांना रोजगार देण्याबाबत घोषणा केल्या. येत्या डिसेंबरपर्यंत अग्निवीरांची पहिली तुकडी तैनात करण्याची सरकारची महत्वाकांक्षा आहे.

चार वर्षांनंतर हे संभाव्य अग्नीवीर निश्चितपणे बेरोजगार होणार नाहीत याची ग्वाही लष्कर उपप्रमुख बी. के. राजू यांनी दिली. याशिवाय जनरल सिंह यांच्यासह अनेक निवृत्त लष्करी अधिकारी पुढे आले आहेत. जनरल सिंह यांच्याशिवाय माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक, माजी हवाई दलप्रमुख आर. के. भदौरिया आदींचा यात समावेश आहे. ही नवीन वादग्रस्त लष्करभरती योजना रेटून नेण्यासाठी एकाद्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यालाही या सर्वोच्च पदासाठी भाजप आघाडीची उमेदवारी जाहीर होऊ शकते अशी राजकीय वर्तुळातील नवी चर्चा आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या ‘धक्कातंत्राच्या‘ पूर्वेतिहासाला साजेसे असे हे नाव असेल असेही सांगितले जाते. भाजप आघाडीच्या उमेदवाराचे नाव आश्चर्यचकित करणारे असेल याबाबत दुमत नाही. दरम्यान चर्चेतील इतर नावांमध्ये कर्नाटकाचे राज्यपाल व ज्येष्ठ भाजप नेते थावरचंद गहलोत, तेलंगानाचे राज्यपाल तमिळसाई सुंदरराजन, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आदींच्या नावांची भर पडली. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, द्रौपदी मुर्मू, अनुसूया उईके आदी भाजप महिला नेत्यांसह शिया मुस्लिम वर्गातून येणारे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची नावे आधीपासूनच चर्चेत आहेत. भाजपचा उमेदवार जाहीर होईपर्यंत ही चर्चा सुरू रहाणार आहे.

जनरल व्ही के सिंह यांच्यासह अनेक निवृत्त लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, अग्निपथच्या विरोधात जाळपोळ सुरू असल्याबद्दल नापसंती व्यक्त केली. ज्यांना देशाबद्दल प्रेम असते तेच लष्करात दाखल होतात. हिंसाचार करणारे सध्याचे आंदोलनकर्ते लष्करी भरतीसाठी पात्रच ठरू शकत नाहीत अशी तीव्र शब्दात जनरल मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. तर जनरल सिंह म्हणाले की ही योजना म्हणजे नवजात शिशुप्रमाणे आहे. किंबहुना या ‘बाळाचा‘ अजून जन्मही झालेला नाही. या स्थितीत ते बाळ पुढच्या आयुष्यात करियर कसे घडविणार? कोण होणार? याच्या कुशंका मनात बाळगून आंदोलनं करणे अत्यंत निषेधार्ह आहेत. संबंधित राज्यांच्या पोलिस दलांनी हा विरोध पहात राहू नये असेही त्यांनी सांगितले.