राशन घेऊन देण्याचा बहाणा करून हातचलाखीने महिलेचे दागिने लंपास

0
90

दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) चिंचवड,
चापेकर चौकात राशन वाटप होत असून ते घेऊन देतो, असा बहाणा करून दोघांनी एका वृद्ध महिलेला नेले. दरम्यान हातचलाखी करून महिलेच्या कमरेच्या पिशवी मधून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्या आरोपींनी नेले. ही घटना रविवारी (दि. 18) दुपारी बारा वाजता चापेकर चौक, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलीचे चिंचवड येथे नारळाचे दुकान आहे. त्या दुकानात फिर्यादी बसल्या होत्या. त्यावेळी तिथे दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादीस ‘आजी चापेकर चौकात राशन वाटप चालू आहे. चल तुला राशन घेऊन देतो’ असे सांगितले. फिर्यादी चापेकर चौकात गेल्या असता तिथे राशन वाटप सुरु नसल्याचे त्यांना समजले. तिथून परत येत असताना त्यांच्या कमरेला असलेली पिशवी आणि त्यात असलेले 31.11 ग्रॅम वजनाचे 92 हजार 180 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. राशनच्या बहाण्याने त्यांना घेऊन जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींनी हातचलाखीने त्यांचे दागिने चोरल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.