रावेत येथील गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा; खासदार श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

0
160

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) – रावेत येथील गायरान जागेवर उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन ही गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवावी. यातून योग्य तोडगा काढावा, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली. तसेच आकुर्डीतील खंडोबा मंदिरालगतची मोकळी जागा कुस्त्यांच्या आखाडासाठी राखीव ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

रावेत येथील गायरान जागा विकसित करणे आणि ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत, तसेच आकुर्डीतील खंडोबा मंदिर परिसर विकसित करण्याबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, तुकाराम भोंडवे, मधुकर भोंडवे, दिवानजी भोंडवे, व्ही.एस.काळभोर, शंकरराव पांढारकर, वैशाली काळभोर, गोविंदराव काळभोर आदी उपस्थित होते.

रावेत येथील 16 एकर जागा महापालिकेला हस्तांतरित झाली आहे. त्यापैकी काही जागेवर पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. उर्वरित जागेवर पंतप्रधान आवास योजना प्रस्तावित आहे. रावेत येथे आवास योजना करु नये, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. ग्रामस्थ न्यायालयात गेले आहेत. आवास योजनेऐवजी परिसरातील नागरिकांसाठी उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनात समन्वय घडवून आणत बैठक घेतली. जागेचा योग्यरितीने वापर करावा. आवास योजनेला जागा देण्याविरोधात ग्रामस्थ न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे यातून योग्य तो तोडगा काढावा अशी सूचना खासदार बारणे यांनी केली

आकुर्डीतील खंडोबा मंदिर देवस्थान आकुर्डी, निगडी परिसरातील नागरिकांचे ग्रामदैवत आहे. आकुर्डीत खंडोबाचे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या लगत महापालिकेची मोकळी जागा आहे. या जागेवर यात्रा भरते. कुस्त्यांचे आखाडे होतात. वाहने पार्किंग केली जातात. महापालिकेने ती जागा देखभाल दुरुस्तीसाठी मंदिर समितीला द्यावी. कुस्त्यांच्या आखाडासाठी जागा राखीव ठेवावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.