रावेत येथिल क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकावर कठोरात-कठोर कारवाई करा; मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी

0
207

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – रावेत येथील एका निवासी अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीवर क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून संचालकाला अटक केली आहे. परंतु सदरील नराधमांकडून असे अनेक प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, त्याचा ही उलगडा व्हावा याकरिता पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस आयुक्तांची भेट घेत संचालकावर कठोरात-कठोर कारवाईची मागणी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवासी अकॅडमी मधील विद्यार्थिनीवर दुष्कृत्य करणारा नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली रावेत येथे निवासी शाळा चालवतो. त्याच शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दि. 30 जानेवारी रोजी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केली. तसेच त्यांचे समुपदेशन करून गैरप्रकार झाला असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनतर आणखी एका पीडित विद्यार्थिनीने गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यावरून शेखवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसेचे उपशहराध्यक्ष चंद्रकांत बाळा दानवले, राजू सावळे, सचिव रुपेश पटेकर, महिला शहराध्यक्ष सिमा बेलापुरकर व शहर संघटक जयसिंग भाट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रारीचे निवेदन दिले.यावेळी पदाधिकाऱ्यांनी नौशाद शेख याने यापूर्वीही असे प्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोप करीत शेख याची चौकशी करणेकामी ‘चौकशी समिती’ गठीत करून कठोरात-कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

क्रिएटिव्ह अकॅडमीची मान्यता रद्द करा: राजू सावळे
निष्पाप मुलींवर झालेला संतापजनक प्रकार पाहता क्रिएटिव्ह अकॅडमीची मान्यता रद्द करून अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे परत करणे कामी तात्काळ उचित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.