रावेत मधील संस्थाचालकावर “पोक्सो” कायद्याखाली कारवाई करा – प्रा. कविता आल्हाट

0
236

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या संस्थाचालकावर कडक कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले. आरोपींना “पोक्सो” कायद्याखाली जन्मठेपेची शिक्षा द्या आणि पीडित मुलीला न्याय द्यावा. तसेच शाळेवरती कडक निर्बंध घालावेत यामुळे भविष्यात शहरात कोणताही संस्थाचालक असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही अशी मागणीही आल्हाट यांनी केली आहे.

रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालक नौशाद अहमद शेख आणि त्याला मदत करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात पक्षाच्या निरीक्षक शितल हगवणे, प्रदेश सचिव शोभा पगारे, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, चिंचवड विभाग अध्यक्ष संगिता कोकाटे, विजया काटे, सपना कदम आदी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांना दिलेली निवेदनात प्रा. आल्हाट यांनी म्हंटले आहे की, क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख याने एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केले आहेत. आरोपीच्या शाळेमध्ये सध्या सुमारे ७५ हून अधिक मुली शिक्षण घेत असून त्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी शेख याच्या विरूध्द एका विद्यार्थीनीने ३० ऑक्टोंबर २०१४ रोजी लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार केली होती, इतर विद्यार्थीनींनीही असे प्रकार घडत असल्याचे सांगितले, परंतु काही कडक कारवाई झाली नसल्याने त्याने पुन्हा असा प्रकार करण्याचे धाडस केले आहे.अशा घटना अतिशय भयावह ,अमानवीय आणि बिभत्स स्वरूपाची असून, अशा घटना भारतासारख्या सुसंस्कृत देशात कुठेही घडू नये म्हणून अशा आरोपांतील आरोपी व अॅकडमीची सखोल तपासणी होऊन आरोपीस कडक शिक्षा लवकरात लवकर व्हावी, शिक्षा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांच्यावतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.