रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकडच्या सेवा रस्त्यांचा प्रश्न सोडवा – नाना काटे

0
105

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन

चिंचवड, दि. ५ : चिंचवड मतदार संघातून जाणाऱ्या मुंबई- बंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाल्याने रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. किवळे ते वाकडपर्यंत असणाऱ्या या सेवा रस्त्यावर सध्या वाहन चालवणे अवघड झाले आहे. अक्षरश: खड्ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे. वाकड परिसरातील सेवा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथील सेवा रस्त्याचे डांबरीकरण करावे, हा रस्ता चांगला करावा, अशी मागणी वारंवार केलेली आहे. मात्र हा सबवे व रस्ता राज्य शासन, केंद्रीय रस्ते मंत्रालय यांच्या कार्यक्षेत्रात येत असून, महापालिका येथे काही काम करण्यास हतबल आहे. त्यामुळे सबवे व सर्व्हिस रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात याव्या व नागरिकांना वाहतुकीच्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगवी परिसरामध्ये स्थलांतरित नागरिकांची भेट घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेत काटे यांनी त्यांना निवेदन दिले.

या निवेदनात काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर झपाट्‌याने वाढत आहे. चिंचवड मतदार संघात येणारा ताथवडे, पुनावळे, रावेत, वाकड परिसराची देखील झपाट्‌याने वाढ झाली आहे. या परिसरात अनेक आयटी कंपन्या व मोठ्या रहिवासी सोसायटी आहेत. त्यातच हा परिसर हिंजवडी आयटी पार्कला लागून असल्याने नागरिक या परिसरात वास्तव्यास पसंती देत असून येथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पुनावळे, ताथवडे, वाकड येथील सब वे अरुंद असून त्यात खड्डे पडलेले आहेत. तसेच या मुंबई बेंगलोर हायवे लगत असणारा सर्व्हिस रस्ता देखील खड्डेमय झाला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, आयटी, व औद्योगिक कामगार वर्ग, महिला, जेष्ठ नागरिक यांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका अडकतात अशा वेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता असते. या त्रासामुळे परिसरातील अनेक कंपन्या व रहिवासी स्थलांतर करीत आहे हि खूप खेददायक बाब आहे.

चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई- बंगळुरू महामार्ग आणि सेवा रस्ता हा राज्य शासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. येथील सेवा रस्त्याचे डांबरीकरण करावे, हा रस्ता चांगला करावा, अशी मागणी वारंवार केलेली आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका ताथवडे, पुनावळे आणि वाकड भागांतील नागरिकांना बसत आहे. सुटीच्या दिवशी व आठवड्याच्या सुरुवातीला या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागतात. हा सबवे व रस्ता राज्य शासन व केंद्रीय रस्ते मंत्रालय यांच्या कार्यक्षेत्रात येत असून, महापालिका येथे काही काम करण्यास हतबल आहे, त्यामुळे आपणच या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने सूचना द्याव्यात जेणेकरून नागरिकांचा त्रास संपेल असे देखील नाना काटे यांनी म्हटले आहे