रावेत-किवळे जाहिरात होर्डिंग दुर्घटनेची सखोल चौकशी करा, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सिमा सावळे यांची मागणी

0
417

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रावेत-किवळे परिसरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुखद घटना घडली. त्याच घटनेतील तीन नागरिक जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. विविध वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानुसार सदर नागरिक हे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. या सर्व घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आज केली आहे. कोसळलेले जाहिरातीचे होर्डिंग हे अधिकृत होते कि अनाधिकृत होते ? सदर जाहिरातीचे होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडी केले होते का याचीसुध्दा सविस्तर माहिती जनतेसमोर आली पाहिजे, असेही सिमा सावळे यांनी म्हटले आहे.

आयुक्त सिंह यांना दिलेल्या निवेदनात सिमा सावळे म्हणतात, ​कोसळलेले जाहिरातीचे होर्डिंग हे अधिकृत होते कि अनाधिकृत होते ? सदर जाहिरातीचे होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले होते का ? जाहिरातीचे होर्डिंगला परवानगी दिली असल्यास अथवा संबंधितांनी परवानगी मागितली असल्यास परवानगीच्या प्रस्तावाप्रमाणेच होर्डिंग उभारले गेले होते का ? होर्डिंग अनाधिकृत असल्यास त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली होती ? होर्डिंग अनाधिकृत असून देखील त्याबाबत कोणतीही कारवाई केली गेली नसल्यास त्याबाबत कोण जबाबदार आहे ? या व अश्या प्रकारच्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी तातडीने सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

शहरातील सुमारे ४३३ अनधिकृत होर्डिंगविरोधात महापालिकेने कारवाई करू नये म्हणून पिंपरी चिंचवड आउट डोअर ऍडव्हरटायझींग असोसीएशन मा. उच्च न्यायालयात गेली होती. मा. उच्च न्यायालयाने पुढील कारवाईस स्थगिती दिली असल्याचे समजते. तसे असल्यास सदर कोसळलेले होर्डिंग हे त्या ४३३ अनधिकृत होर्डिंगपैकी होते का ? सदर होर्डिंग अनधिकृत असल्यास अशा अनधिकृत होर्डिंगमुळे पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तातडीने मा. उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्यात यावा. तसेच अनधिकृत होर्डींग्सबाबत मा. उच्च न्यायालयाने त्वरित निर्णय द्यावा ही विनंती करण्यात यावी. जेणेकरून यापुढे होऊ शकणारे असे प्रकारांना टाळता येतील, असेही सिमा सावळे यांनी सुचविले आहे.

शहरात अशी अनेक होर्डिंग कोसळली –
काल झालेल्या वादळी पावसामुळे शहरात इतर अनेक ठिकाणी छोटे-मोठे जाहिरातीचे होर्डिंग कोसळले आहेत. सुदैवाने असे होर्डिंग्स कोसळून कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु सदर कोसळलेले होर्डिंग हे अधिकृत होते कि अनाधिकृत होते याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. अश्या अधिकृत होर्डींग्स विरोधात देखील कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच काल झालेल्या वादळी पावसामुळे असंख्य होर्डींग्स धोकादायक पद्धतीने वाकले आहेत अथवा अर्धवटपणे छिन्न – विछिन्न झाले आहेत. असे धोकादायक होर्डींग्स तात्काळ काढण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

वस्तुत: काल घडलेल्या घटनेमुळे ही बाब देखील समोर आलेली आहे कि, होर्डींग्स मध्ये हवा जाण्यासाठी ठिकठिकाणी छिद्र/Air Gaps उपल्ध नाहीत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होर्डींग्स कोसळतात किंवा वाकू शकतात. मोठ-मोठ्या होर्डिंग्समध्ये छिद्र/Air Gaps उपल्ध असल्यास, त्यामधून हवा जाऊ शकते, ज्यामुळे बॅनर आणि होर्डिंग्सवर दबाव कमी होतो व ते सुरक्षित राहू शकतात. परंतु मनपा हद्दीत उभे असलेल्या होर्डिंगला छिद्र/Air Gaps उपल्ध नसल्याने असे होर्डींग्स अधिक धोकादायक ठरतात. त्यामुळे सदर तांत्रिक मुद्द्याबाबत विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून यापुढील जीवित हानी टाळता येईल.

शहरात असलेल्या जाहिरात होर्डींग्सचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे व नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे . कालच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च मनपाने करावा ही विनंती. या सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन दुःखद घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण त्वरित देऊन त्याबाबतची समिती गठीत करण्यात यावी. निश्चित कालमर्यादेत समितीने अहवाल सादर करण्याचे देखील आदेश देण्यात यावे. तसेच यापुढे अश्या घटना घडू नये यासाठी उपाययोजना / तांत्रिकपद्धतीने भक्कम होर्डींग्स उभे करण्याचे धोरण तातडीने तयार करण्यात यावे, अशी आग्रही मागणी देखील सिमा सावळे यांनी केली आहे.