रावेतऐवजी शिवणेतील बंधा-यातून पाणी उचला – श्रीरंग बारणे

0
338

पिंपरी 9 मार्च – पवना नदीवरील रावेत बंधा-यातील पाणी अतिशय खराब आहे. त्यामुळे महापालिकेने तेथून पाणी उचलणे बंद करावे. शिवणे येथील बंधा-यातून पाणी उचलण्यासाठी प्रयत्न करावेत. पाईपालईन टाकण्यासाठी जागेचे भूसंपादन करावे, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित कामे आणि विविध विकास कामांबबात खासदार बारणे यांनी ९ मार्च रोजी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महापालिका अधिका-यांची आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे आदी बैठकीला उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, शहरातील पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष्य द्यावे. पवना नदीवरील रावेत बंधा-यातील पाणी अतिशय खराब आहे. तेथून उचललेले पाणी शुद्ध केले जाते. पण, या पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील अनेक नाले थेट नदीपात्रात मिसळतात. ड्रेनेज, स्टॉम वॉटर लाईनच्या नाल्यासाठी स्वतंत्र लाईन काढावी. मैलामिश्रीत पाणी नदीपात्रात जाणार नाही. याची खबरदारी घ्यावी. रावेत बंधा-याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्याच्या कामाला गती द्यावी. रावेत बंधा-याऐवजी शिवणेतील बंधा-यातून पाणी उचलण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी पाईपलाईन टाकण्याकरिता जागेचे भूसंपादन करावे.

चापेकर वाड्याचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. या कामाला गती द्यावी. त्यासाठी अधिकचा निधी लागल्यास राज्य शासनाकडून दिला जाईल. महापालिकेतील शिपाई संवर्गातील कर्मचा-यांना वाढीव वेतनश्रेणी मिळावी. घंटागाडी कामगारांचे प्रश्न सोडवावेत. निगडीतील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची कामे तत्काळ मार्गी लावावीत. पवना नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा लवकर पूर्ण करावा. त्याच्या कामाला गती द्यावी. शहरातील कमी खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांचा जैव वैद्यकीय कचरा, परवनाग्याबाबत अनेक अडचणी आहेत. त्यासाठी रुग्णालय संघटनेचे तीन प्रतिनिधी आणि महापालिका अधिका-यांची संयुक्त समिती गठित केली जाणार आहे. ही समिती रुग्णालयाच्या अडचणी दूर करेल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले. शहरातील अनेक मालमत्तांची नोंद झाली नाही. जवळपास ३५ हजार मालमत्तांच्या नोंदी नाहीत. त्या मालमत्तांच्या नोंदी करुन त्यांना कर रचनेत आणावे. ज्यांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरला आहे. त्यांना दिलासा द्यावा. ती रक्कम समायोजित करावी.

संरक्षण विभागाच्या प्रश्नांबाबत लवकरच संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक
देहूरोड आयुध निर्माण कारखान्याचा (अम्युनिशन फॅक्टरी) संरक्षक भिंतीपासून दोनशे मीटर यार्ड हद्दीत किती कामे चालू आहेत, किती लोक बाधित होतील. याचा सर्व्हे करावा. बांधकाम परवानगी विषयक विकास करणे थांबविता येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने संरक्षण विभागाला लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होते की नाही हे तपासावे. या भागातील लोकांना त्रास देवू नये. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.