रायफल शूटिंग स्पर्धेसाठी थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे 8 विद्यार्थी पात्र

0
251

पिंपरी, दि.३० (पीसीबी ) -जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये ओपन रायफल शूटिंग प्रकारात महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे 8 विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. या स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप आणि माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी किट देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आज आणि उद्या अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे रायफल शूटिंग रेंज या ठिकाणी रायफल शूटिंगच्या विभागीय स्पर्धा संपन्न होणार आहे. या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये 19 वर्षाखालील मुलांमध्ये ओंकार गायकवाड, आदिल अन्सारी, अमन अन्सारी यांचा समावेश असून 19 वर्षाखालील मुलींमध्ये राधिका पुजारी, मोनिका सोनवणे, स्नेहल खाडे यांचा समावेश आहे. 17 वर्षाखालील मुला मुलींच्या गटात अनुक्रमे भावेश कवळे, प्रज्ञा संगट यांचा समावेश आहे.

एकूण 8 विद्यार्थ्यांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून राष्ट्रीय पंच विजय रणझुंजारे यांनी या विद्यार्थ्यांना रायफल शूटिंगचे प्रशिक्षण मोफत दिले होते. शाळेचे मुख्याध्यापक ए. व्ही. फुगे, तसेच सायली गोरक्ष, सोनाली पाटील, सोनाली जाधव यांनी देखील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.