मुंबई, दि. २१ (पीसीबी) शिवसेनेतून एक मोठा नेता आपल्यासोबत अनेक महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन बाहेर पडणार अशी सकाळपासून चर्चा आहेच. एकनाथ शिंदे हे व्यक्तिमत्व शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नंतर असणारे महत्त्वाचे नेतृत्व आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल का उचलले असावे? किंवा केवळ आपली ताकद आणि महत्त्व दाखवण्यासाठी हा प्रकार आहे का? हा वेगळा चर्चेचा विषय ठरेल. परंतु, ते जर बाहेर पडलेच; तर त्यांच्या सोबत कोणते महत्त्वाचे आमदार असतील हे पाहू. शिवाय रायगड हातून जाणार का? हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग.
कोण आहेत ‘ते’ आमदार?
सध्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, उदयसिंग राजपूत, भरत गोगावले, नितीन देशमुख, अनिल बाबर, विश्वनाथ भोईर, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, महेश शिंदे, शहाजी पाटील, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, श्रीनिवास वनगा, राजकुमार पटेल, प्रदीप जयस्वाल, महेंद्र दळवी, सुहास कांदे, बालाजी किणीकर हे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई आणि ठाणेनंतर शिवसेनेची मजबूत पकड असणारा रायगड जिल्हा. या जिल्ह्यातून महाविकास आघाडीनंतर बऱ्याचदा तेथील आमदारांची राष्ट्रवादीच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात नाराजी समोर आली होती. परंतु, त्यावर कोणतीही क्रिया शिवसेनेकडून अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून न झाल्याने महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे नाराज होते. रायगडमध्ये शिवसेनेचा पालकमंत्री असावा अशी त्यांची मागणी नेहमी दुर्लक्षित राहिल्याने आज हे तिन्ही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची दाट शक्यता आहे. यामुळेच अलिबागमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपुजनाला हे तिन्ही नेते गैरहजर होते. रायगडमध्ये शिवसेनेची पकड मजबूत राखून ठेवलेले भरत गोगावले जर बाहेर पडले, तर शिवसेनेचे कोकणातले अस्तित्व निघून जाण्याची दाट शक्यता आहे.