राम मंदिर राष्ट्रार्पण निमित्त अध्यात्मिक उपक्रम– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

0
270

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)- श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू या तीर्थक्षेत्रांच्या सानिध्यात असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भजन महोत्सवाचा ‘निनाद’ ऐकायला मिळणार आहे. वारकरी आणि अध्यात्मिक सांप्रदायाचा वारसा असलेल्या शहरामध्ये ही स्पर्धा भक्तीभय वातावरणात संपन्न होणार आहे.

श्रीक्षेत्र अयोध्या येथे राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा दि. २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. या निमित्त चिखली- जाधववाडी येथे भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

चिखली- जाधववाडी येथील रामायण मैदानावर दि. गुरूवार, दि.१८ जानेवारी ते शनिवार दि. २० जानेवारी २०२४ असे तीन दिवस भजन महोत्सव होणार आहेत. ह.भ.प. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महोत्सव होणार असून, वारकरी आणि अध्यात्म क्षेत्रातील भाविक, नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

सुमारे १०० पेक्षा जास्त भजनी मंडळांचा सहभाग आहेत. त्यासाठी वारकरी क्षेत्रातील जाणकार ३ परीक्षक असतील. प्रत्येक भजनी मंडळाला १५ मिनिटे सादरीकरण करता येणार आहे. प्रत्येक भजनी मंडळात १० सदस्य संख्या, सांप्रदायिक क्षेत्रातील गवळणी व अभंग सादर होतील. भजनासाठी साहित्य स्पर्धक संघाला स्वत: आणावे लागेल. एकूण तीन दिवसांत रोज ३० भजनी मंडळांना महोत्सवात सहभागी होता येईल. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तीन सत्रामध्ये हा महोत्सव होणार आहे. तसेच, प्रत्येक सहभागी संघासाठी स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे, अशी माहिती ह.भ.प. काळुराम देवकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9881780752 आणि 8788369468 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.