रामदेवबाबांच्या पतंजलीला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका

0
78

मुंबई, 30 जुलै (पीसीबी) – मुंबई उच्च न्यायालयाने योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला मोठा झटका दिला आहे. कोर्टाच्या अंतरिम आदेशाच उल्लंघन केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे. अंतरिम आदेशात कोर्टाने पतंजलीला कापूरवाल्या उत्पादनांची विक्री करु नका, असं सांगितलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पतंजलीने जाणीवपूर्वक कोर्टाच्या आदेशाच उल्लंघन केलं, असं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आरआय चागला यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन करण्याचा पतंजलीचा इरादा होता, यात कुठलाही संशय नाहीय, असं कोर्टाने म्हटलं.

हायकोर्टाने मागच्यावर्षी अंतरिम आदेश दिला. त्यात पतंजलीला कापूरपासून बनवलेल्या उत्पादनांची विक्री रोखण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान मंगलम ऑर्गनिक्स लिमिटेडने याचिका दाखल करुन पतंजलीवर न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन केल्याचा आरोप केला. सुनावणी दरम्यान पतंजलीने न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. कोर्टाने म्हटलं की, “पतंजली एक श्रीमंत कंपनी आहे. आदेश दिल्यानंतर पतंजली फक्त उत्पादनाची विक्री करत नव्हती, तर त्यांचं उत्पादन सुद्धा सुरु होतं”

हायकोर्टाने दोन आठवड्यांच्या आत पतंजलीला 4 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. याआधी या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने पतंजलीला 50 लाख रुपये जमा करण्यास सांगितले होते. एकूण मिळून पतंजलीला 4.50 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला. त्यांनी पतंजलीला कापूरपासून बनवलेली उत्पादन विकायला आणि त्याची जाहीरात करण्यावर मनाई केली. मंगलम ऑर्गनिक्सच्या याचिकेवर हा आदेश कोर्टाने दिला होता.