जालना ,दि.२९ (पीसीबी)- जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील रामदास स्वामींच्या देवघरामधील मूर्ती काही दिवसापूर्वी चोरीला गेल्या होत्या. चोरी झालेल्या मूर्ती 450 वर्ष जुन्या होत्या.या प्रकरणामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या 2 आरोपींकडून हनुमानाच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या पूरातन मूर्त्या 25 हजारामध्ये विकल्या गेल्याची देखील माहिती समोर आली आहे. जांब येथील राम मंदिरातून भगवान राम, देवी सीता, भगवान लक्ष्मण आणि भगवान हनुमानाच्या पंचधातूंच्या एकूण दहा मूर्ती चोरीला गेल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या या चोरी प्रकरणामध्ये काही मूर्तींची विक्री करण्यात आली आहे. तर काही मुर्त्या आरोपींकडून जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. 22 ऑगस्टला जालना मध्ये झालेल्या या चोरीचं प्रकरण जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून एसआयटी कडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर आता या प्रकरणाला आता वेग आला आहे.
अटक झालेल्या दोन व्यक्तींपैकी एक आरोपी चोरी प्रकरणामध्ये सामील झाला होता. तर दुसरा आरोपी चोरी खरेदी-विक्रीमध्ये सहभागी होता. अद्यापही मुख्य आरोपी फरार आहे. या फरार आरोपींकडे इतर मूर्त्या असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे.