रामदास कदम स्वकेंद्रीत, आत्मपरीक्षण करण्याचा शिवसेनेचा सल्ला

0
200

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेतील नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर मोठे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला रामदास कदम यांनी दिला असून शिवसेनेपेक्षा शरद पवार मोठे आहेत का? अशी विचारणा केली आहे. यानंतर शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनीच आत्मपरीक्षण करावं असा सल्ला दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी रामदास कदम यांच्यावर चांगलीच टीका केली.

“ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी एकही अवाक्षर काढलं नव्हतं. मी मरेपर्यंत शिवसेनेसोबत आहे एवढं बोलल्याचं माझ्या लक्षात आहे. अडीच वर्षात त्यांनी मातोश्रीवर पाय ठेवला होता का? शिवसेना नेते म्हणून तुमची नैतिक जबाबदारी होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अभिनंदनही केलं नव्हतं. ही स्वयंकेंद्रीत लोकं असून, मोठ्या मनाची नव्हती आणि आजही नाहीत,” अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

“शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला काय दिलं नाही हे त्यांनी सांगावं. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जनतेने नाकारलं होतं, तेव्हा तुम्ही शिवसेना प्रमुखांना आमचं पुनर्वसन करा अशी विनंती केली होती. त्यावेळी यांचं आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं सुरु झालं होतं. तो प्रयत्न सुरु केल्याचं लक्षात येताच पक्षाने काळजी घेतली. यानंतर शिवसैनिकाला बाजूला करुन त्यांना तिकीट दिलं आणि विधानपरिषदेवर आणलं. यानंतरही तुमचं समाधान होत नाही का?,” अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे.

“शरद पवार असोत किंवा काँग्रेस असो शिवसेना सुरुवातीपासून विरोधात होती. पण कडाडून टीका करताना बाळासाहेब मैत्रीदेखील जपत होते. सुप्रिया सुळे लोकसभेत उभ्या राहिल्या तेव्हा बाळासाहेबांनी शरद पवारांना फोन केला होता. शरदबाबू तुम्ही सुप्रियांना उभं करतंय का अशी विचारणा केली होती. यानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेचा उमेदवार विरोधात न देण्याचा निर्णय घेतला होता. पण यानंतरही राजकीय लढाई सुरुच होती, पण मैत्री आणि माणुसकी किती होती पहा. हे यांना काय माहिती आहे. तेव्हा शरद पवारांना भेटू नका असा विरोध केला नाहीत,” याची आठवण अरविंद सावंत यांनी करुन दिली.